काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला राहुल गांधी-पटोलेंवर केलेलं विधान भोवणार, होणार पक्षातून हकालपट्टी?

Politics : वारंवार पक्षाच्या नेतृत्वावर टीका करत असल्याने काँग्रेसमधील बड्या नेत्यावर  काँग्रेसकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत तो नेता?
नागपुरचे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. देशमुख यांच्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात देशमुख यांनी वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांनी माफी मागावी, असंही ते म्हणाले होते.

आशिष देशमुख यांनी आपल्याच पक्षातील मोठ्या नेत्यांवर टीका केली आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली होती. त्यामुळे आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आला आहे.

तुम्ही वारंवार पक्ष विरोधी, पक्षाच्या नेत्यांविरोधी वक्तव्य का करता, अशी विचारणा प्रदेश काँग्रेस समितीकडून आशिष देशमुख यांना करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र देशमुख यांना देण्यात आलं आहे. या पत्राच उत्तर आशिष देशमुख यांनी दिलं नाही. शिवाय माफीही मागितली नाही. त्यामुळे आशिष देशमुख यांची हकालपट्टी काँग्रेसमधून निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे.