मोदी जिंकले नाही तर शेअर बाजार 25 टक्क्यांनी घसरणार? अमेरिका म्हणते…

नवी दिल्ली : देशात लोकसभा २०२४ चे राजकीय पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने हॅक्ट्रिक करण्यासाठी तर विरोधीपक्षांनी बाजी पलटवण्यासाठी जोर लावला आहे. कोणत्याही प्रमुख देशात सत्तापरिवर्तन होणार की नाही? स्थिर सरकार येणार की नाही? या सर्व गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावरही होतो. यातच आता अमेरिकन गुंतवणूक बँक जेफरीज एलएलसीकडून एक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जेफरीज एलएलसीच्या इक्विटी स्ट्रॅटेजीचे ग्लोबल हेड ख्रिस वुड यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेवर आला नाही, तर भारतातील इक्विटी मार्केटमध्ये मोठी घसरण होईल. ख्रिस वुड म्हणाले की, भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला नाही तर भारतीय शेअर बाजारात 25 टक्क्यांनी घसरण होऊ शकते. वुड म्हणतात की, सध्याच्या सरकारने जागतिक पुरवठा साखळीला आकर्षित करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. ख्रिस वुडने बिझनेस स्टँडर्डच्या एका इव्हेंटमध्ये असे भाष्य केले आहे.

2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या पराभवानंतर शेअर बाजारात पुढच्या 2 दिवसांत 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकारने दक्षिण आशियाई अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी तयार केलेली धोरणे कायम ठेवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पहिल्या 2 दिवसांचे नुकसान काही प्रमाणात सावरण्यात बाजाराला यश आले.