भारतीय लष्कराची ताकद वाढणार, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : केंद्र सरकार भारतीय सैन्यदलाला आत्मनिर्भर बनवण्यासोबतच अत्याधुनिक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी रेजिमेंट आकाश शस्त्र प्रणाली आणि शस्त्र शोध रडार – स्वाती (मैदानी) खरेदी करण्यासाठी ९ हजार १०० कोटींहून अधिक रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार, भारतीय सैन्याला आगामी काळात आकाश शस्त्र प्रणालीच्या २ रेजिमेंट आणि १२ रडार – स्वाती मिळणार आहेत.
या करारामध्ये लष्कराच्या एअर डिफेन्सच्या 3ऱ्या आणि 4थ्या रेजिमेंटसाठी प्रगत आकाश क्षेपणास्त्र व्यवस्थेच्या खरेदीसह थेट क्षेपणास्त्रे आणि प्रक्षेपक, ग्राउंड सपोर्ट उपकरणे, वाहने आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा समाविष्ट आहेत. भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत ८ हजार १६० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा करार करण्यात आला आहे. आकाश वेपन सिस्टम ही शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल (एमआरएसएएस) हवाई संरक्षण प्रणाली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डिआरडीओ) त्याची निर्मिती केली आहे. प्रगत आकाश शस्त्र प्रणाली भारतीय सैन्यात समाविष्ट केल्याने भारताची कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेत आत्मनिर्भरता वाढेल. यात साधक तंत्रज्ञान, कमी केलेले फूटप्रिंट, आणि सुधारित पॅरामीटर्स आहेत. हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी आकाश शस्त्र यंत्रणा भारताच्या उत्तर सीमेवर तैनात केली जाणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत (बीईएल) स्वाती रडारसाठी ९९० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा करार करण्यात आला आहे. हे स्वदेशी बनावटीचे रडार आहे असून बंदुका, मोर्टार आणि रॉकेट शोधण्याच्या क्षमतेसह सुसज्ज आहे. यामध्ये प्रत्युत्तर देण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता आहे. यामुळे सैन्याला शत्रूच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांचे कार्य पार पाडता येते. येत्या २४ महिन्यांत हे रडार सैन्यदलात सामील होण्याची योजना आहे.