तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढणार

तरुण भारत लाईव्ह । २ एप्रिल २०२३ । एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या बहुतांश भागांत तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढून 35 ते 38 अंशांपर्यंत जाईल. मात्र, कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात हीच स्थिती राहील. तथापि, एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात देशभरातील तापमानात मोठी वाढ होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील तीन महिन्यांच्या काळात तापमान सामान्यापेक्षा जास्त राहणार आहे. विशेषत: बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये उन्हाच्या झळा जास्त बसतील, अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी आभासी पत्रपरिषदेत दिली.

सर्वाधिक पाऊस गुजरातमध्ये
कमाल तापमानात सतत चार ते पाच अंशांनी घट दिसून आली आणि असा प्रकार मार्च महिन्यात प्रथमच घडला. सर्वाधिक पाऊस गुजरात व कच्छमध्ये झाला असून, तिथे सर्व 33 जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. महाराष्ट्रात मार्चमधील सरासरीपेक्षा 53 टक्के अधिक पाऊस झाला. ध्य भारतात सरासरी पाऊस 33 ते 36 मिमी इतका होतो तर, देशात सरासरी 26 ते 29 मिमी पाऊस होतो.
उन कमी अन् पाऊस जास्त
यंदा मार्चमध्ये उन कमी अन् पाऊसच जास्त होता. देशातील 36 पैकी 22 राज्यांत अतिवृष्टी तर, दोन राज्यांत मुसळधार, पाच राज्यांत साधारण, चार राज्यांत कमी पाऊस झाला. पाऊस पडला नाही, असे एकही राज्य नाही. मार्च महिन्यात सरासरी कमाल तापमान कुठेही 40 अंशांवर गेले नाही. उलट त्यात सतत तीन ते चार अंशांनी उतार होताना दिसला. त्यामुळे यंदाचा मार्च हा सर्वांत थंड ठरला.