तरुण भारत लाईव्ह । १४ एप्रिल २०२३। देशात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने इशारा देताना म्हटलेय, देशातील अर्ध्या भागात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये पुढील 72 तास कमाल तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होईल. तर महाराष्ट्रात विदर्भ चांगलाच तापलाय.
देशभरात तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. येत्या तीन दिवसात उष्णतेचा झळा चांगल्याच जाणवू शकतात. उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पार गेले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत देशभरात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढू शकते.
देशात येत्या 48 तासांत उष्णतेने कहर पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि बिहारच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विशेषत: 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत मध्य, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेषत: देशाच्या मध्यवर्ती भागात, पश्चिम-पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडसह लगतच्या भागातही तापमानात सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.