नवी दिल्ली : देशभरात उष्णता वाढू लागली आहे. तापमानात हळूहळू वाढ होत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केले आहे. त्यांनी सर्वांना ‘राष्ट्रीय कृती आराखड्या’कडे लक्ष देण्यास सांगितले आहे. देशात काही ठिकाणी तापमान आधीच उच्च पातळीवर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत उष्णतेमुळे होणारे आजारही वाढू लागतील. हे लक्षात घेऊन केंद्राने सर्व राज्यांना आधीच सतर्क केले आहे.
पत्रात म्हटले आहे की 1 मार्च 2023 पासून, सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPCCHH) अंतर्गत उष्णतेशी संबंधित रोगांवर दैनंदिन निरीक्षण एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म (IHIP) वर केले जाईल.
Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Chief Secretaries & Administrators of all States/Union Territories regarding daily surveillance on heat-related illnesses that will be done in all states & districts from 1st March 2023. pic.twitter.com/6DqM1m4YMP
— ANI (@ANI) February 28, 2023
NPCCHH, NCDC, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना पाठवलेल्या या पत्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व राज्यातील जिल्हा आणि शहर आरोग्य विभागांना उष्णतेशी संबंधित आरोग्य कृती योजना पुन्हा लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच, राज्याच्या आरोग्य विभागांना वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्राउंड लेव्हल वर्कर्सना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापन याबाबत जागरूक करण्यास आणि क्षमता वाढीचे प्रयत्न सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
आरोग्य विभागाला सूचना दिल्या
सर्व अत्यावश्यक औषधे, इंट्राव्हेनस फ्लुइड्स, आइस पॅक, ओआरएस आणि सर्व आवश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. आरोग्य सुविधा सज्जतेचा आढावा घेतला पाहिजे. तसेच सर्व आरोग्य सुविधांमध्ये पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.