शरद पवार गटाच्या खेळीने अजित पवार गटाचं वाढणार टेन्शन!

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, शरद पवारांचा का अजित पवारांचा ? यावर आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटानं मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवार यांच्या गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी ९ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज निवडणूक आयोगातील सुनावणीला स्वत: उपस्थित राहणार आहेत. ही सुनावणी सुरु होण्यापूर्वीच त्यांच्या गटाकडून मोठी खेळ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते आणि व्हीप म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विधानसभेच्या ४१ आमदारांविरोधात निलंबनाच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तर, विधानपरिषदेतील ५ आमदारांविरोधात देखील निलंबन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.

विधानसभा अध्यक्षांकडून निलंबन याचिकांवर कार्यवाही होत नसल्यानं जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम अजित पवारांच्या सह ९ आमदार, नंतर विधानसभेचे २० आमदार, विधानपरिषदेचे ४ आमदार, यानंतर विधानसभेचे १२ आमदार अशा तीन टप्प्यात निलंबन याचिका सादर केल्या आहेत.