काय सांगता, चोरट्यांनी चोरलं रेल्वेचं आख्खं डिझेल इंजिन

मुझफ्फरपूर : रेल्वेमध्ये किंवा रेल्वे परिसरात होणार्‍या चोर्‍यांबद्दल आपण सर्वांनी ऐकलं आहेच. मात्र बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात चोरांनी चक्क बोगदा खोदून रेल्वेचं डिझेल इंजिन चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरहारा रेल्वे यार्डात हा प्रकार घडला आहे. या यार्डात इंजिनाचे सुटे भाग दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले होते. ते चोरट्यांनी लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुझफ्फरपूरमधील रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक पी. एस. दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रेल्वे यार्डपर्यंत बोगदा खोदून त्या मार्गाने इंजिनाच्या लोकोमोटिव्ह भागासह इतर साहित्य लंपास केल्याची कबुली आरोपींनी चौकशीदरम्यान दिली आहे. अटकेतील आरोपींनी भंगार गोदामाच्या मालकाचाही उल्लेख केला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुझफ्फरपूर जिल्ह्यातील प्रभात नगरमधील भंगार गोदामात शोधमोहीम राबवली. या गोदामातून रेल्वे इंजिनाचे सुटे भाग असलेली १३ पोती पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त केलेल्या साहित्यात इंजिनासह व्हिंटेज ट्रेनची चाकं आणि रेल्वेच्या अवजड लोखंडी भागांचा समावेश आहे.