पुणे : मागील १२ ते १३ दिवसांपासून वराळे आणि लगतच्या भागात गाड्यांच्या बॅटरी आणि डिझेल चोरी करणारे चोरटे वराळे येथील तरुण आणि पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटले. मात्र, पळून जात असताना त्यांची गाडी पलटी झाली आणि त्यांनी गाडी जागेवर सोडून पळ काढला. ही घटना काल रात्री (दि. २९) अडीचच्या सुमारास घडली.
वराळे, आंबेठाण आणि लगतच्या एमआयडीसी परिसरात मागील १२-१३ दिवसांपासून रात्रीच्या वेळी क्रेन, बस, पोकलेन, जेसीबी आदी मोठ्या वाहनांमधून बॅटरी आणि डिझेल चोरी होण्याच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या चोऱ्यांमुळे वाहनचालक आणि उद्योजक मोठ्या अडचणीत आले होते.
वराळे येथे लर्निंग ट्री शाळेजवळ पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या, सिंडलर कंपनीजवळ उभ्या असलेल्या वाहनांमधून तसेच आंबेठाण येथे अमोल दवणे यांच्या गाडीची बॅटरी आणि डिझेल, तसेच वराळे येथे सागर आंद्रे यांच्या क्रेनची बॅटरी व डिझेल चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी वराळे येथील तरुण उद्योजक सुरज कामठे यांनी रात्रीच्या वेळी पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांच्या सतर्कतेमुळे चोरटे त्यांच्या जाळ्यात अडकले. रात्रीच्या वेळी राखाडी रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन हे चोरटे आले होते. चोरी करताना त्यांना पकडण्यात आले. मात्र, चोरट्यांनी प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला.
पळताना गाडी पलटी, नंबरप्लेट आणि कागदपत्रे सापडली
चोरटे पळताना कोरेगाव खुर्द येथील देवतळी घाटात त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडी पलटी झाली. मात्र, अपघातानंतरही चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या गाडीला कोणतीही नंबरप्लेट नव्हती. मात्र, गाडीत एमएच 14 सीएक्स 7302 हा नंबर असलेली प्लेट आणि इतर कागदपत्रे सापडली. या घटनेची माहिती मिळताच म्हाळुंगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू असून, लवकरच या चोरट्यांचा छडा लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.