मुंबई : राज्याच्या राजकारणात मंगळवारीपासून धमक्यांच्या फोनचं सत्र सुरू आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं. त्यानंतर दुपारी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, मंत्री धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन आला आणि आज आणखी आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.
तू महाराष्ट्रभर फिरणं बंद कर. नाहीतर तुझ्या जीवाचं काही तरी करून टाकू. अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने रवी राणा यांना दिला आहे.
तू एवढ्या वेळेस आमच्या विरोधात कसा काय बोलतो. आता हे सगळं थांबव नाही तर तुला संपून टाकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.
आमदार रवी राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 507 नुसार छत्रपती संभाजीनगरमधल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा धमकी प्रकरणाचा राजापेठ पोलीस तपास करीत आहेत.