Shrinivas Vanga । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरचे काही तास उरले आहेत. त्यातच पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले असून, काल रात्रीपासून ते नॉट रिचेबल आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते. यानंतर गेल्या १४ तासांपासून श्रीनिवास वनगा यांचा फोन नॉट रिचेबल आहे.
श्रीनिवास वनगा यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. ते आपले दोन्हीही मोबाईल बंद करुन घरातून निघून गेले. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी एका पिशवीत काही कपडे भरले होते. ती पिशवी घेऊन श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडले.
त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे कोणालाही सांगितलं नाही. तसेच त्यांचा फोनही बंद आहेत. आम्ही त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. मी त्यांच्या मित्रांनाही फोन केला. त्यांच्याकडे विचारपूस केली. मी त्यांच्या ड्रायव्हर, बॉडीगार्डलाही विचारलं. रात्री अंधार होता, त्या अंधारात ते घराबाहेर पडले आणि पटापट चालत गेले, असे सुमन वनगा यांनी म्हटले.
दरम्यान, श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडून आता बरेच तास उलटले आहेत. त्यांनी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. सध्या श्रीनिवास वनगा यांचा पोलीस शोध घेत आहेत.