धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचासह शिरपूर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोंडाईचा येथे आचार्याचा चाकूचे वार करीत निर्घृण खून करण्यात आला तर शिरपूर तालुक्यातील लालमाती येथे अनोळखीचा खून करून रस्त्यावर मृतदेह फेकण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
दोंडाईचा शहरात मध्यप्रदेशातील आचार्याचा खून
दोंडाईचा : दोंडाईचा नंदुरबार-रस्त्यावरील हॉटेल पुष्पामध्ये काम करणार्या मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या आचार्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत नरेश लालचंद शाहू (वय 54) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नरेश लालचंद शाहू गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेलमध्ये कार्यरत होता. रात्री आचारीचे काम केल्यानंतर मयत हा हॉटेलात झोपत होता. रविवारी मध्यरात्री नरेश शाहू यास कोणीतरी अज्ञाताने चाकूने भोसकल्याचा प्रकार समोर आला असून सोमवारी सकाळी ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी दोंडाईचा पोलीस निरीक्षक केवलसिंग पावरा व सहकार्यांनी धाव घेत घटनास्थळावरून दोन चाकू जप्त केले. दरम्यान, आचारी नरेश याच्या खुनाचे कारण अद्याप अस्षष्ट असलेतरी हॉटेलमध्ये काम करणार्या दोन सहकार्यांवर पोलिसांना संशय असून ते पसार झाल्याने त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचाही प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
शिरपूर तालुक्यात खून करून मृतदेह फेकला
शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावरील लालमाती रस्त्यावर 35 ते 40 वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा टि शर्ट आणि अंडरपॅन्ट घातलेला अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सोमवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनोळखी युवकाची हत्या करून रस्त्यावर मृतदेह टाकण्यात आल्याची शंका आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मयताची दोन बूट जप्त केले आहे तर ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मयत हा व्यवसायाने चालक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस अधिकार्यांची धाव
खुनाची माहिती मिळताच धुळे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर, सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक संदीप पाटील, कृष्णा पाटील, एएसआय कैलास जाधव, संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, इसरार फारुक व एलसीबी कर्मचार्यांनी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.अनोळखी मृतदेह शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलीस पाटील मांगीलाल पावरा यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकर्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.