तरुण भारत लाईव्ह । १५ मे २०२३। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धरणात पोहोण्यासाठी उतरलेल्या सातपैकी दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला असून स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अन्य पाच मुलींचे प्राण वाचविले. ही घटना सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हवेली तालुक्यातील गोर्हे खुर्द गावाच्या हद्दीतील खडकवासला धरणात घडली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संजय लहाणे हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. कामधंद्यासाठी ते गाव सोडून गोर्हे खुर्द येथे आलेले असून धरणाच्या पाण्याच्या कडेला ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. त्याकरिता बुलढाणा व जळगाव येथून त्यांचे नातेवाईक आलेले होते. सकाळी मुलींनी पोहण्याचा हट्ट केला. या सर्व मुली पाण्याकडे गेल्या. त्यावेळी काही महिलांनी मुलींना पाण्यात जाण्यापासून रोखले. परंतु, त्यांचे न ऐकता मुली पाण्यात पोहण्यासाठी उतरल्या.
खुशी संजय खुर्दे (वय १३, पाण्याच्या टाकीजवळ, सोळंकी लेआऊट, ता. बुलढाणा) शितल भगवान टिटोरे (वय १८, आंबोडा झरीझरी, ता. जि. बुलढाणा) ही मृत मुलींची नावे आहेत. कुमुद संजय खुरदे (वय १०), पायल संतोष सावळे (वय १६, रा. राजीवनगर, सुरत, गुजरात), शितल अशोक धामणे (वय १७, रा. बोधवड जि. जळगाव.), राशी सुरेश मांडवे (वय ०९, रा.देऊळघाट , बुलढाणा), पल्लवी संजय लहाणे (वय १०, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा ) मिना संजय लहाणे (वय ३२, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा), राखी संजय लहाणे (वय १६, रा. बोरगाव ता चिखली, बुलढाणा) यांना वाचविण्यात यश आले आहे.