---Advertisement---
धुळे : कापडणे गावात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, शाळेत जात असलेल्या एका ७ वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी सकाळी दहा वाजता आपल्या घरून जिल्हा परिषद मराठी कापडणे येथील शाळेकडे जात असताना नवा दरवाजा चौकात मोकाट कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.
वेळीच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी धाव घेऊन कुत्र्याला बाजूला केले आणि मुलीला तात्काळ कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि नागरिकांनी उपसरपंच तसेच सदस्यांना मोकाट भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्या आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









