जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत २७ गावांमध्ये २०२० शेततळे बांधण्यात येणार असून, त्यात वाघूर धरणाचे पाणी साठवले जाणार आहे. हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून, शाश्वत सिंचन सुविधेसोबत भूजल पातळी सुधारण्यास देखील मदत करेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि फायदे
- शाश्वत सिंचन व्यवस्था
शेततळ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही पाणीपुरवठा उपलब्ध होईल. यामुळे पारंपरिक तसेच आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक आणि तुषार सिंचन) वापरणे शक्य होईल.
- जलसंधारण आणि पाणीबचत
शेततळ्यातील पाणी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी वापरल्यास पाण्याचा कार्यक्षम उपयोग होईल आणि जलसंधारणास चालना मिळेल.
- शेती उत्पादनात वाढ
नियोजनबद्ध सिंचनामुळे शेतकरी वर्षभर विविध पिके घेऊ शकतील. परिणामी, उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढेल.
- स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
- शेततळ्या मध्ये मत्स्य पालन केल्यास , शेती पुरक जोड धंदा ऊपलब्ध होईल. व्यवसाय बळकट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल
वाघूर उपसा जलसिंचन योजनेचा विस्तार
वाघूर उपसा जलसिंचन योजना क्र. १ आणि २ सध्या कार्यान्वित असून, या योजनेतून १९,१३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
योजनेअंतर्गत गाडेगाव, जामनेर आणि गारखेडा या तीन शाखांमधून १०,१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
२७ गावांमध्ये २,०२० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी २१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
गाडेगाव शाखेतील गाडेगाव, नेरी बुद्रुक, नेरी दिगर, चिंचखेडा, करमाड व पळासखेडा येथे ७० शेततळ्यांमध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ९०% पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. आतापर्यंत १,१८९ शेततळ्यांचे करारनामे पूर्ण झाले आहेत.
त्यातील २१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
सिंचन सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी शासन देखील कटीबद्ध आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.
या प्रकल्पाची गती वाढवण्यावर भर दिला जात आहे.
वाघूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकरी संवाद बैठका विविध गावांमध्ये घेण्यात आल्या.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
शेततळ्यांबाबत शंका-निरसन बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
उर्वरित करारनामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
जलसंधारणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
गोंडखेल येथील शेततळे हा केवळ जलसंधारण प्रकल्प नसून, तो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा आहे.
या प्रकल्पामुळे शेतीसाठी आवश्यक जलसाठवण क्षमता वाढेल.
भूजल पातळी सुधारेल, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
जलसंधारण आणि आधुनिक सिंचनाच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील शेती अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. – जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव