अग्रलेख…
अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला आहे. घडला म्हणण्यापेक्षा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो घडवून आणला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 2019 साली जनमत Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असताना शरद पवार यांनी कटकारस्थान करून त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, त्यांची टिंगलटवाळी केली, आपणच राज्यातल्या राजकारणातील ‘चाणक्य’ आहोत, ‘जाणते’ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आधी उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष फोडून आणि आता पावसात भिजलेल्या काकांचा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीने हे सिद्ध केले आहे की, तेच राज्यातल्या राजकारणातील ‘निर्विवाद बॉस’ आहेत. पाच दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रिय असलेल्या काकांना धोबीपछाड देत वैदर्भीय देवेंद्र फडणवीसांनी स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळविले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरून कमी लेखण्याचे आणि त्यांना अपमानित करण्याचे पाप शरद पवारांनी एकदा नव्हे, अनेकदा केले आहे. फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत, राजकारणातही त्यांनी कौशल्य प्राप्त केले आहे, परिश्रमी आहेत, पक्ष आणि कामाप्रती समर्पित आहेत, भूमिकेप्रती प्रामाणिक आहेत आणि त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान प्राप्त केले आहे, हेही निर्विवाद सत्य आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. वयाच्या नवव्या दशकातील त्यांचा प्रवास सुरू आहे. चाटुकार त्यांना ‘जाणते’ म्हणूनही संबोधतात. पण, वयाच्या नवव्या दशकात असणारे शरद पवार हे अलीकडच्या काळात ज्या प्रकारची वक्तव्ये करीत आहेत, ते पाहता ते किती ‘जाणते’ आहेत, हे सहज लक्षात येते. सत्ता गेल्यापासून ते बावचळल्यासारखे वागताना दिसत आहेत. जातिपातीवरून समाजात फूट पाडण्याचे त्यांचे छुपे आणि उघड प्रयत्न कुणापासूनही लपून राहिलेले नाहीत. विशेषत: ब्राह्मण समाजाबाबत त्यांच्या मनात असलेला आकस वेळोवेळी प्रदर्शित झाल्याचे पुरोगामी म्हणविल्या जाणार्या महाराष्ट्राने पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रिपदी बसलेले त्यांना पाहवत नाही, हे एकदा नव्हे, अनेकदा स्पष्ट झाले आहे. Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांची जात पाहूनच पवार त्यांना लक्ष्य करतात आणि तरीही स्वत:ला पुरोगामी असल्याचे भासवितात, हा दुतोंडीपणा राज्यातल्या जनतेने ओळखला आहे. परवा म्हणजे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजून 25 मिनिटांनी समृद्धी महामार्गावर खाजगी बसला अपघात झाला आणि त्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, त्या घटनेवर प्रतिक्रिया देतानाही पवारांनी फडणवीसांना मध्ये आणलेच. समृद्धीवर झालेल्या अपघातात जो मृत्युमुखी पडतो, तो ‘देवेंद्रवासी’ होतो, असे लोक म्हणतात, हे वाक्य पवारांनी बोलण्याची काही आवश्यकताच नव्हती. पण, राज्यात कुठेही काही खुट्ट वाजले की Devendra Fadnavis फडणवीसांवर टीका करायची, ही पवारांना आता सवयच जडली आहे. राज्याच्या राजकारणात आपल्यापेक्षा कुणी मोठा होतो आहे, यशस्वी होतो आहे, आपले सगळे डावपेच आपल्यावरच उलटवतो आहे, हे शरद पवारांना सहन होऊच शकत नाही. होणारही नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी चाणक्य निर्माण झालेला पवारांना आवडत नाही. त्यात देवेंद्र फडणवीस हे तर पवारांच्या अर्ध्या वयाचे नेते. शिवाय ब्राह्मण. अशा परिस्थितीत पवार फडणवीसांचे अस्तित्व आणि कर्तृत्व मान्य करतील, याचा विचार कुणी स्वप्नातही करू नये.
समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर त्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करणे स्वाभाविक होते. पण, संवेदना व्यक्त करताना Devendra Fadnavis फडणवीसांचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नव्हती. पवार प्रत्येक वेळी जाणूनबुजून फडणवीसांवर टीका करतात. भाजपाला सांप्रदायिक ठरविण्याचा प्रयत्न करतात, हे महाराष्ट्राने नेहमीच अनुभवले आहे. आज काय झाले? शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच देवेंद्रवासी झाला आहे. नियतीचा खेळ बघा कसा विचित्र असतो. नियतीला जे मंजूर होते, तेच महाराष्ट्राच्या राजकारणात घडले आहे. याच शरद पवारांनी 1978 साली वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसत विश्वासघात केला होता आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. आज, त्याच पवारांच्या पाठीत त्यांच्या सख्ख्या पुतण्याने आणि विश्वासू सहकार्यांनीच खंजीर खुपसला, याला नियतीचा खेळच म्हणावा लागेल. अजित पवारांनी बंड करून पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरही दावा सांगितला असल्याने, जी स्थिती उद्धव ठाकरे यांची झाली तशीच आता शरद पवारांची होणार आहे. करावे तसे भरावे, या उक्तीची प्रचीती शरद पवार यांना घ्यावीच लागेल. त्यापासून त्यांची सुटका नाही. खरे तर वय लक्षात घेता त्यांनी आता राजकारणात सक्रिय राहण्याऐवजी विश्रांती घ्यायला पाहिजे. पण, त्यांना मोह आवरेनासा झाला असल्याने आजवर जे कमावले आहे, ते उतार वयात घालवतील की काय, अशी शंका वाटायला लागली आहे.
Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राजकारणात खळबळ उडाली. काल रविवार होता. दुपारची वेळ होती. लोक सुटीच्या मूडमध्ये होते. त्यातच अजित पवारांच्या बंडाची बातमी येऊन धडकली आणि जनमानस खडबडून जागे झ्राले. जे घडले, त्यामुळे अनेकांना धक्का बसला. काहींना सुखद, तर काहींसाठी हा दु:खद धक्का होता. यावेळी शपथ घेण्यासाठी एकटे अजित पवार नव्हते, तर त्यांच्यासोबत भुजबळ, वळसे पाटील यांच्यासह अन्य आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पहाटेच्या शपथविधीनंतर जे घडले, तसे यावेळी घडू नये याची पुरेपूर काळजी घेऊनच अजित पवार राष्ट्रवादीतील 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन ‘देवेंद्रवासी’ झाले. यावेळचे बंड हे विचारपूर्वक नियोजन करून करण्यात आले, हे अजितदादांसोबत असलेल्या संख्याबळावरून आणि सोबत आलेल्या नेत्यांवरून स्पष्ट झाले आहे.
विधान परिषदेतील सहा आमदारही अजितदादांसोबत आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते व लोकसभेचे सदस्य, पक्षाचे खजिनदार सुनील तटकरे हेही दादांसोबत आल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार यावेळी अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे यावेळचे बंड हे मजबूत असून राज्यातील राजकारणात उलटफेर घडविण्याची फडणवीसांची क्षमताही पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कालचा पोरगा म्हणून फडणवीसांवर टीका करणार्या सगळ्यांची तोंडे बंद झाली आहेत. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या कंड्या राजकीय वर्तुळात पिकविल्या जात आहेत. पण, देवेंद्र फडणवीस हे राज्याबाहेर जाणार नाहीत; राज्यात राहूनच पुढचे राजकारण करतील, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. शरद पवार यांनी परवा ‘देवेंद्रवासी’ असा टोकाचा शब्द का वापरला होता, त्याचा अर्थ आज सगळ्यांच्या लक्षात आला असेल. बंड होण्याची कल्पना त्यांना होती आणि ते रोखण्याची क्षमता आपल्यात नाही, हे लक्षात आल्यानेच त्यांनी Devendra Fadnavis फडणवीसांबाबत अतिशय खालच्या पातळीवर जात शब्दप्रयोग केला होता, हेही एव्हाना स्पष्ट झाले आहे. प्रफुल्ल पटेल हे अत्यंत विश्वासू सहकारी बंडात सामील झाल्याने शरद पवार दु:खी झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. पण, जे दु:ख पवारांनी वसंतदादांना दिले होते, तेच आज उतारवयात त्यांच्या वाट्याला आले, हे नैसर्गिक आहे. हे दु:ख पचविण्याची पवारांची क्षमता किती, हे येणार्या काळात दिसेलच!