अरे देवा, तापमानाबाबत हवामान खात्याने दिला मोठा इशारा

पुणे : राज्यभरात सुर्य आग ओकत असल्याने उष्णतेच्या लाटेमुळे घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा ४० अंशाच्या पार गेला आहे. जळगाव जिल्ह्यात तर देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरात उष्माघाताने मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. अशातच पुढील पाच दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामाना खात्याने दिला आहे.

एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातल्याने त्या महिन्यात उन्हाळा जाणवलाच नाही. मे महिन्याच्या सुरुवातीही तसे फारसे उनं नव्हतेच मात्र अचानक तापमानात बदल झाला. वातावरणातील गारव्याची जागा उष्णतेने घेतली. गत १५ दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस नवनवे विक्रम करत आहे. महाराष्ट्रात वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

एकदाचा कधी मान्सून येतो याचीच सारे प्रतीक्षा करत आहेत. मात्र, पुढील आणखी पाच दिवस तापमानाचा पारा असाच आणखी वाढत जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस दोन ते तीन अंशाने तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आधीच उष्णता खूप आहे, त्यात जर आणखी वाढ झाली तर उष्माघाताने आजारी पडणार्‍यांची संख्याही वाढू शकते.

विदर्भ आणि मराठवाडाच्या तुलनेत तरी इतर जिल्ह्यांमध्ये तापमान कमी असले तरी आद्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवेल. तर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा उन्हाळा हा अधिक धोकादायक सिद्ध झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रात यावर्षी उष्माघाताचे १४७७ रुग्ण आढळून आले आहेत. तर, उष्माघातामुळे डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.