Dhule News : लग्नाच्या वऱ्हाडाची बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली!

धुळे ।  जिल्ह्यातील सोनगीर-दोंडाई रस्त्यावरील डांगुर्णे गावाजवळ एका खासगी लक्झरी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही बस लग्नाच्या वर्‍हाडाला घेऊन धुळ्याहून शहादाकडे जात असताना हा प्रकार घडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांचे संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनगीर-दोंडाई रस्त्यावर डांगुर्णे गावाजवळ प्रवासादरम्यान बसला अचानक आग लागली. बस चालकाने सतर्कता दाखवत बस तत्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. आगीचा भडका एवढा मोठा होता की वऱ्हाड्यांना त्यांच्या सामानाकडेही बघण्याची संधी मिळाली नाही. संपूर्ण बस काही मिनिटांत जळून खाक झाली.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीमुळे रस्त्यावर बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. आगीचे भडके आणि जळणाऱ्या बसमुळे इतर वाहने सुरक्षित अंतरावर थांबली होती.

पोलीस आणि प्रशासनाची तातडीची दखल

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग कशामुळे लागली, बसमध्ये कोणत्या सुरक्षाव्यवस्था होत्या याबाबत तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे प्रवाशांना मोठा मानसिक धक्का बसला असला तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, भररस्त्यात अशा प्रकारे लक्झरी बसला आग लागण्याची घटना चिंतेचा विषय असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.