‘समतोल’च्या कार्यकर्त्यांने प्रसंगावधान राखत वाचविले महिलेचे प्राण…

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : भुसावळ रेल्वेस्थानकावर ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून पिण्याचे पाणी भरण्यासाठी खाली उतरलेल्या महिला रेल्वेत चढत असताना पाय घसरून प्लॅटफॉर्मवरून पडत होती. हा प्रकार लक्षात आल्याबरोबर तेथे उपस्थित असलेल्या केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ‘समतोल’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांने महिलेला आधार देऊन तिचे प्राण वाचविले.

भुसावळ स्थानकवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून एक महिला पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरली असता, पाणी भरण्यापूर्वीच रेल्वे सुरू झाल्याने महिला धावपळ करीत रेल्वे पकडण्याच्या प्रयत्न करीत असताना, महिलेचा पाय घसरून प्लॅटफॉर्मच्या खाली रेल्वेच्या चाकात पडत असताना, समतोल प्रकल्पाच्या प्रतिभा महाजन, प्रशांत चौधरी, दीपक पाचपांडे आणि हवालदार सुधीर पाटील यांनी महिलेला बाहेर खेचले व अपघात होण्यापासून वाचविले.