मुजफ्फरनगर : दोन वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला झालेल्या भीषण अपघातात त्याचा जीव वाचवणाऱ्या तरुणाने स्वतःच्या आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रेमभंगाच्या दु:खातून त्याने आपल्या प्रेयसीसोबत विष प्राशन केले. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असून, तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पुरकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुच्चा गावात हा हृदयद्रावक प्रकार घडला. २५ वर्षीय रजत कुमार आणि २१ वर्षीय मनु कश्यप यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, वेगवेगळ्या समाजातील असल्याने त्यांच्या नात्याला कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी वेगळ्या जोडीदारांची निवड केली, त्यामुळे निराश झालेल्या या प्रेमी युगुलाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.
हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’
रजत आणि मनुने ९ फेब्रुवारीच्या रात्री एकत्र विष प्राशन केले. त्यांना कोणीही समजून घेत नसल्याने आत्महत्या हा एकमेव मार्ग उरल्याचे त्यांना वाटले. काही वेळाने बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मनुचा मृत्यू झाला, तर रजतवर अद्याप उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून, तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
मृत तरुणीच्या आईचे रजतवर गंभीर आरोप
मनुच्या मृत्यूनंतर तिच्या आईने रजतवर गंभीर आरोप केले आहेत. “रजतने माझ्या मुलीला घरातून पळवून नेले आणि तिला विष पाजले,” असा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, रजत शुद्धीवर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी ऋषभ पंत दिल्लीवरून उत्तराखंडला जात असताना त्याच्या कारचा भीषण अपघात झाला होता. गुरुकुल नारसन हायवेवर झालेल्या या अपघातात पंतची गाडी जळून खाक होण्याच्या काही क्षण आधीच रजत आणि त्याच्या मित्राने त्याला बाहेर काढले होते. या दोघांनीच पोलिसांना माहिती देऊन पंतच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता.
या पराक्रमामुळे ऋषभ पंतने कृतज्ञता व्यक्त करत रजतला स्कूटी भेट दिली होती. मात्र, दुर्दैवाने तोच तरुण आता स्वतःच्या आयुष्याची लढाई लढत आहे. या बातमीमुळे अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.