Baramati Crime News : तरुणीसोबतचं नातं विचारणं पडलं महागात ! वाचा, नेमकं काय घडलं ?

Baramati Crime News : बारामतीतील वंजारवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने दुसऱ्या युवकावर केवळ कॅफेमध्ये बसलेल्या मुलीसोबत नात्याबद्दल जाब विचारल्याच्या कारणावरुन कोयत्याने वार केले.

ही घटना १७ जानेवारी रोजी घडली, ज्यामध्ये नागेश ज्ञानदेव गोफणे ( १९) याने सिध्दार्थ सुनील चौधर ( १९) यावर कोयत्याने मानेवर, पाठीत व मांडीवर वार केले. सिध्दार्थच्या हातावर देखील वार झाला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.

नागेश गोफणेवर सिध्दार्थ चौधर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बारामतीच्या कॅफेमध्ये घडली, जिथे नागेश गोफणे हा नात्यातील मुलीसोबत बसला होता, यावरून सिध्दार्थने त्याला जाब विचारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी नागेश गोफणे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, गेल्या काही दिवसात बारामतीमध्ये कोयत्याने वार होणारी ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, बारामती पोलिस दलात फेरबदलाची मागणी जोर धरत आहे.

तसेच, एफआयआर दाखल झाल्यानंतर ते २४ तासांच्या आत सार्वजनिक वेबसाइटवर टाकणे आवश्यक असतानाही याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची माहिती समोर येत आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर शंका व्यक्त केली आहे, ज्यामुळे बारामतीत पोलिस दलातील फेरबदलाची आवश्यकता समोर येत आहे.