जळगाव : जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खून होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही एक दिवसा आधी किनगावातील एका वृद्धाचा खुनाची घटना ताजी असतांना पुन्हा चोपडा तालुक्यातील मितावली येथे धक्कादायक घटना उघडीस आली आहे. लहान भावानेच आपल्या सख्ख्या मोठ्या भावाला विळ्याने वार करून ठार केलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
चोपडा तालुक्यातील मीतावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित १० एकर शेती करतात. दोघंही विवाहीत असून शनिवारी दि २५ रोजी दोन्ही मुले संदिप व सतीष पाटील हे पारगाव शिवारात असलेल्या भेंडी तोडण्यासाठी शेतात गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. ३३ वर्षीय सतिष या लहान भावाने मोठा भाऊ संदिप पाटील (३६) याच्यावर धारदार विळ्याने वार करीत शेतातच खून केला. गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही.