सातारा : साताऱ्यात एक थरारक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या डोक्यात गोळ्या झाडन्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. तरुणाच्या डोक्यात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमित भोसले रा. शुक्रवार पेठे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढे फाट्याच्या एका टपरीजवळ गाडीत बसून नाष्टा केल्यानंतर हात धुवत असताना दोन हल्लेखोरांनी अमित भोसले यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. अमित यांच्यावर हल्लेखोरांनी एकूण चार गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चार गोळ्या झाडल्या गेल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमित भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.
अमित भोसले यांचा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा खून का केला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून सातारा पोलिसांची १० शोधपथके हल्लेखोरांना पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.