Narayan Surve : आपल्या कवितांमधून वास्तववादी चित्रण, समाजाला आरसा दाखवणारे लोकप्रिय कविवर्य नारायण सुर्वे यांनी आयुष्याने दिलेले संघर्ष, अडचणी, हालअपेष्टा आपल्या कवितांमधून मांडल्या. त्यांचं मराठी साहित्यामध्ये मोठं योगदान आहे. मात्र आता त्यांच्या नवी मुंबई येथील घरी चोरी घडल्याची घटना समोर येते आहे. त्यातही गंमत अशी की हे घर नारायण सुर्वे यांचं आहे हे समजताच चोराने चक्क चोरलेल्या वस्तू परत आणून ठेवल्या आणि सोबत एक चिठ्ठी लिहीत माफीही मागितली.
नेमकं काय घडलं ?
गंगानगर परिसरात नारायण सुर्वे यांचे घर आहे. या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्याने सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. घारे दाम्पत्य दहा दिवसांसाठी मुलाकडे विरार येथे गेले होते. घराचं दार बंद असल्याने चोरट्याने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, घरात कोणतेही दागिने, पैसे सापडले नाहीत. त्यामुळे त्याने घरातील एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी तसेच धान्य चोरायचं ठरवलं. मात्र, चोराला घराच्या भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला. आपण चोरी करत असलेलं घर हे नारायण सुर्वे यांचं आहे हे त्याला समजलं. त्यानंतर त्याला पश्चाताप झाला आणि त्याचं मन बदललं. चोराने नेलेल्या सगळ्या गोष्टी त्याने परत आणून ठेवल्या. त्यानंतर त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहीत त्यांची माफीही मागितली.
काय म्हटले आहे चिठ्ठीत ?
चोरी करत असलेले घर कविवर्यांचे आहे हे मला माहीत नव्हते. नाही तर मी या घरात चोरी केलीच नसती. मला माफ करा. मी चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करेन. मी चोरी केलेला टीव्हीही परत आणून ठेवला आहे. सॉरी…