तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील कुसूंबा शिवारातील विशाल कुलर या फॅक्टरीतून गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी चार कुलर आणि एक गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना घडली.
अयोध्या नगर येथील विशाल ढवळे यांची कुसुंबा शिवारातील हॉटेल शिवशाही जवळ विशाल कुलर हि फॅक्टरी आहे. विशाल ढवळे हे गुरूवारी मध्यरात्री १२.१० वाजेच्या सुमारास फॅक्टरी बंद करून घरी निघून गेले होते. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी फॅक्टरीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चार कुलर व गॅस सिलिंडर चोरून नेले.
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कामगार हा फॅक्टरीवर आला. तेव्हा त्याला १६ पैकी ४ कुलर कमी दिसले तर गॅस सिलेंडर सुध्दा चोरीला गेलेले दिसून आले. त्यांनी लगेच मालक विशाल यांना संपर्क साधून फॅक्टरीमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली. विशाल ढवळे यांनी फॅक्टरीत येऊन पाहणी केली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. रामकृष्ण पाटील करीत आहे.