---Advertisement---
धुळे : शिंदखेडा तालुक्यात सध्या खताची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. खरीप हंगामासाठी अत्यंत आवश्यक असलेले डीएपी खत तालुक्यात आलेलेच नाही, तर १०:२६:२६ या खताचाही गेल्या एक महिन्यापासून तुटवडा जाणवत आहे.
पिके खत देण्याजोगी झाली असताना, खताच्या कमतरतेमले शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यात कमी प्रमाणात खत उपलब्ध होत असल्याने शेतकरी आणि खत विक्रेते यांच्यात सतत वाद होत आहेत. त्यातच, कृषी अधिकाऱ्यांचे खत तपासणीचे अधिकार काढन घेण्यात आल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. तालुक्यात किती खत आले आणि ते कुठे गेले, याचा कोणताही ताळमेळ लागत नसल्याने गोंधळ वाढला आहे.
तपासणी अधिकार नसल्याने बोगस खतांचा धोका
कृषी अधिकाऱ्यांकडील तपासणी अधिकार काढल्यामुळे बाजारात बोगस खते येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. उपलब्ध असलेल्या खतांमध्ये कोणते खत मान्यताप्राप्त आहे किंवा कोणते बोगस आहे, हे ओळखणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. या परिस्थितीत, खतांच्या तुटवड्यासाठी किंवा बोगस खतांच्या तक्रारीसाठी कुठे जावे, याची माहितीही शेतकऱ्यांना दिली जात नसल्याने ते पूर्णपणे हैराण झाले आहेत. शासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.