हातभट्टी वाल्यांची पळता भुई थोडी; ९२ आरोपींना अटक, १३ आरोपींचा शोध सुरु

तरुण भारत लाईव्ह । जळगाव (Jalgaon) : राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागाद्वारे धडक कारवाई केली असून जिल्हाभरात गावठी दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकाचवेळी जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून जवळपास साडे सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी (Jalgaon Police) विशेष पथक तयार करून कारवाई केली आहे. जिल्ह्यातील काही भागात गावठी दारूची तयार होत असल्याची माहिती मिळाल्यांनतर धडक कारवाईला सुरवात झाली. १८ रोजीच्या धडक कारवाईत या अड्ड्यांच्या चालकांवर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली तब्बल ९२ आरोपींना अटक तर १३ आरोपींचा शोध सुरु आहे. १३२४ लिटर गावठी दारु जप्त तर १८६७३ लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत ७५२२५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ६ अधिकारी २४ कर्मचारी, पोलीस विभागाचे ४६ अधिकारी २२२ कर्मचारी सहभागी होते.

 

जळगाव जिल्हा पोलिसांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध व्यवसाय रोखण्यासाठी जळगाव पोलीस आणि विशेष पथक तयार करण्यात आले आहेत या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर धडक कारवाया करण्यात आल्या असून यापुढे जिल्हाभरात धडक मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी अवैध व्यवसाय संबंधी जळगाव पोलिसांच्या हेल्पलाइनवर माहिती द्यावी, असे आवाहन जळगाव पोलीस दलाने केलेले आहे.