Nandurbar News : मरणातही सुटका नाही; स्मशानभूमीसाठी नदीपात्रातूनच…

नंदुरबार : जिल्ह्यातील माडवी आंबा गावात मरणानंतरही सुटका नसल्याचेच चित्र आहे. या गावाची स्मशानभूमी वाल्हेरी नदीच्या पलीकडे आहे आणि नदीवर पूल नाही. पावसाळ्यात नदीला पाणी असते.

पाऊस असल्यास पुराचा धोका असतो मात्र माडवी आंबाकरांना जीव मुठीत धरुनच अंत्ययात्रा नदीच्या प्रवाहातूनच काढावी लागते. त्यामुळे स्मशानभूमीच्या मार्गावर फरशीपूल करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

माडवी आबां गावाजवळून देव वाल्हेरी नदी वाहते. नदी गावाला वळसा घालून पुढे जाते. नदीचा प्रवाह अगदी गावाला खेटून वाहत असल्याने आता गावातील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंतसुध्दा पोखरली गेली आहे. त्यामुळे शाळा इमारतीला देखील धोका निर्माण झाला आहे. सध्या सातपुड्यातून वाहत येणाऱ्या देव वाल्हेरी नदीला पाणी आहे.

कमी पाण्यातून मार्गक्रमण करता येते. परंतु पूर असल्यास तो ओसरण्याची वाट पाहावी लागते. या मार्गावर फरशी पुलाबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीसह स्थानिक लोकप्रतिनिधीं कडे सातत्याने पाठपुरावा केला असून कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.