---Advertisement---
जळगाव : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा करत “ऑपरेशन टायगर संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी होत आहे आणि १०० टक्के कोकण खाली होणार आहे,” असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गुलाबराव पाटील यांनी नांदेडमध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश झाल्याचा उल्लेख करत संपूर्ण राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ प्रभावीपणे राबवले जात असल्याचा पुनरुच्चार केला. “खरी शिवसेना कोणाची आहे, हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळेच खरे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सोबत येत आहेत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ
संजय राऊतांवर टीका
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन करतील, असा दावा केला होता. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी, “संजय राऊत यांचं ऑपरेशन कसं होईल, हे त्यालाच माहिती आहे,” असा खोचक टोला लगावत एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तसेच काँग्रेसच्या काही नेत्यांचा शिंदे गटात जाण्याचा विचार सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि रमाकांत म्हात्रे हे धनुष्यबाण हाती घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबत सुभाष बने, गणपत कदम आणि चंद्रकांत मोकाटे हेही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
‘ऑपरेशन टायगर’चा वाढता प्रभाव
शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून राज्यभर आपले संघटन वाढवण्याचा सपाटा लावला असून, अनेक ठिकाणी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसच्या नेत्यांचा गटांतराचा कल दिसून येत आहे. नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या भागांमध्येही आगामी काही दिवसांत मोठे इनकमिंग होणार असल्याचा दावा केला जात आहे.
राज्यातील राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत आणखी मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नकाशावर ‘ऑपरेशन टायगर’ कितपत प्रभाव टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









