मुंबई : राज्यातील महायुतीची एक बैठक काल (३१ ऑग.) रात्री वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रहारचे बच्चू कडू, रासपाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, जनसुराज्यचे विनय कोरे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आदी नेते, मंत्री, खासदार, महायुतीतील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
जपानच्या कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केल्याबद्दल यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत एकूण 3 ठराव पारित करण्यात आले. दोन ठराव अभिनंदनाचे होते, तर एक ठराव संकल्पाचा होता. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ, भारताचे सर्व नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. गेल्या सरकारच्या काळात राज्याची घसरगुंडी थांबवून आता सर्वच क्षेत्रात राज्याने गगनभरारी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक, सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प पुन्हा वेगाने ऑनट्रॅक आले आहेत. याबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले.
तिसरा ठराव संकल्पाचा होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दणदणीत बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते स्वतःला संकल्पबद्ध करीत आहेत, असेही या ठरावात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि एकदिलाने काम करू, अशा आशयाची छोटेखानी भाषणे यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, जोगेंद्र कवाडे यांची झाली.