World Cup २०२३ : ‘हे’ पाच डावखुरे गोलंदाज टीम इंडियाचे टेन्शन वाढवणार

World Cup २०२३ : ODI वर्ल्डकप या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित केला जाईल. मात्र आता टीम इंडिया अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. भारतीय संघाला नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या वनडे मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव संघासाठी अजिबात चांगला नाही, कारण त्याचा परिणाम विश्वचषकावर होऊ शकतो. दरम्यान, स्टार्कच नाहीतर इतरही डावखुरे गोलंदाज टीम इंडियाचे टेन्शन वाढवणार आहेत.

विशाखापट्टनम वनडे सामन्यात स्टार्कने आघाडीची फळीला तंबूत पाठवले आहेत. भारतीय संघाविरोधात डावखुरे वेगवान गोलंदाज प्रभावी ठरत असल्यामुळे प्रत्येक संघ एकतरी डावखुरा गोलंदाज संघात ठेवतोय.  50 षटकांच्या विश्वचषकात टीम इंडियाला या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तीन ते चार वर्ष झाले तरी याची तोड अद्याप मिळालेली नाही. विश्वचषक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. अशात भारतीय टीम काय उपाय योजना करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क जगातील सर्वात घातक डावखुऱ्या वेगवान गोलंदाजापैकी एक आहे. स्टार्कने नेहमीच टीम इंडियाला अडचणीत टाकलेय. आताच झालेल्या वनडे सामन्यातही स्टार्कने दिग्गज खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. स्टार्कच्या घातक गोलंदाजीपुढे टीम इंडियाला 120 धावाही करता आल्या नाहीत. अशातच आगामी विश्वचषकात टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा असेल.

न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचा जगभरात डंका आहे. ट्रेंट बोल्ट याने जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. टीम इंडियाविरोधातही बोल्टची कामगिरी जबरदस्त आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या जबरदस्त गोलंदाजी करत आहे. जगातील आघाडीच्या फलंदाजाला त्याने बाद केलेय. भारताविरोधात आफ्रिदी अधिक घातक होतो… दुबईत झालेल्या टी 20 विश्वचषकात तर आफ्रिदीने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.. रोहित-राहुल यांना तर त्याचा चेंडूच समजला नव्हता.

इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करनही भारताची डोकेदुखी वाढवू शकतो. विशेषकरुन अखेरच्या षटकात सॅम करन अधिक घातक गोलंदाजी करतो. अशात सॅमचा सामना करण्यासाठी टीम इंडियाला रणनिती आखावी लागणार आहे.

विश्वचषकात बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतो. मुस्तफिजुर रहमान याच्या स्लोअर यॉर्करपुढे जगातील दिग्गजांनी नांगी टाकली आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे धावा काढणे कठीण आहेच. दरम्यान, स्टार्कच नाहीतर इतरही डावखुरे गोलंदाज टीम इंडियाचे टेन्शन वाढवणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाला याची तयारी करावीच लागणार आहे.