१ मेपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम ; थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार

मुंबई । आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून नवा मे महिना सुरू होत आहे. खरंतर प्रत्येक महिन्याची 1 तारीख काही ना काही बदल घडवून आणते. पण 1 मे 2024 अनेक अर्थांनी खास आहे.  उद्यापासून बदलणाऱ्या नियमाचा थेट  परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

कारण १ मे पासून आयसीआयसीआय बँकेसह अनेक बँकांचे सेवा शुल्क वाढण्याची शक्यता आहे. तसेच, पेट्रोलियम कंपन्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत काही कपात करू शकतात. याशिवाय क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी किमान शिल्लक वाढवण्याची घोषणाही केली आहे. हे सर्व नियम १ मे पासून लागू होणार आहेत.

ICICI बँकेकडून या सेवा शुल्कात वाढ 
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ICICI ने आधीच जाहीर केले होते की 1 मे पासून ग्राहकांना अनेक गोष्टींसाठी जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. यामध्ये चेक बुक, IMPS, ECS/NACH डेबिट रिटर्न, स्टॉप पेमेंट शुल्क इत्यादी सेवांचा समावेश आहे. इतकंच नाही तर ICICI बँकेच्या वेबसाईटनुसार हे बदल 1 मे 2024 पासून लागू होतील. याशिवाय डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क 200 रुपये असेल. तर ग्रामीण भागासाठी ते वर्षाला ९९ रुपये असेल.

एलपीजी सिलेंडरची किंमत
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. ज्यामध्ये 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत समाविष्ट आहे. 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात 30 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 1 मे रोजी 14 किलोच्या सिलेंडरची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी अद्याप अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. पण तरीही यावेळी घरगुती सिलिंडरच्या दरात निश्चितच कपात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

येस बँकेनेही केले बदल
येस बँकेबद्दल बोलायचे झाले तर अनेक प्रकारचे शुल्क बदलण्यात आले आहे. बचत खात्यातील किमान शिल्लक रक्कम वाढवण्यात आली आहे. येस बँकेच्या बचत खात्याच्या प्रो मॅक्समध्ये किमान सरासरी ५० हजार रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न केल्यास, जास्तीत जास्त 1,000 रुपये शुल्क आकारले जाईल. तर सेव्हिंग अकाउंट प्रो प्लसमध्ये 25 हजार रुपये किमान सरासरी शिल्लक राखणे अनिवार्य करण्यात आले आहे. बदललेले नियम 1 मे 2024 पासून लागू केले जातील. नियमांचे पालन न करणाऱ्यांना 750 रुपये दंड भरावा लागेल.

क्रेडीट कार्ड
1 मे पासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही काही बदल दिसत आहेत. बहुतेक बँक क्रेडिट कार्ड युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त 1% आकारतील. IDFC फर्स्ट बँकेने जाहीर केले की ते 1 मे 2024 पासून त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त 1 टक्के शुल्क आकारतील.