मार्च महिना संपायला अवघा उद्याचा दिवस उरला आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याला सुरुवात होईल. प्रत्येक महिण्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमात बदल केले जातात. त्यानुसार दोन दिवसानंतर म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून अनेक बदल होणार आहेत . ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया 1 एप्रिलपासून कोणते नियम बदलत आहेत.
एलपीजी गॅसच्या किमती वाढू शकतात
एलपीजी (LPG) गॅसच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलल्या जातात. मात्र, काही वेळा शासनाकडून त्यात कोणताही बदल केला जात नाही. १ एप्रिलपासून एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 350 रुपयांनी वाढली आहे.
वाहने महाग होतील
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वाहन खरेदी करणे महाग होऊ शकते. नवीन उत्सर्जन मानकांमुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार असून, त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हॉलमार्किंगशी संबंधित नियमात बदल होणार
1 एप्रिलपासून देशभरात फक्त सहा अंकी ‘हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन’ क्रमांक असलेले सोनेच विकले जाईल. म्हणजेच 31 मार्चनंतर सोनार (Gold) जुने हॉलमार्क असलेले दागिने विकू शकणार नाही.
विमा पॉलिसीवर कर लागणार
2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार विम्याचा वार्षिक प्रीमियम 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकरण्यात येणार आहे. आतापर्यंत विम्याचे नियमित उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त असायचे मात्र 1 एप्रिलपासून या नियमात बदल करण्यात येणार आहे.
एलपीजी, सीएनजी, पीएनजीच्या दरात बदल
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या तेलाच्या किंमतींमध्ये बदल करतात. यामुळे यावेळी तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी आवश्यक
डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी ठेवणं आवश्यक असणार आहे. या नामांकनाची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. तुम्ही नॉमिनी न ठेवल्यास 1 एप्रिलपासून ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट गोठावलं जाईल.
एप्रिल 2023 मधील बँकांच्या सुट्ट्या
एप्रिल महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहे. सात विकेंडच्या सुट्ट्या आणि आंबेडकर जयंती, महावीर जयंती, ईद अशा सुट्ट्यांमुळे बँक 15 दिवस बंद असेल.
NSE वरील व्यवहार शुल्कात 6 टक्के वाढ मागे घेणार
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने यापूर्वी कॅश इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर 6 टक्के शुल्क आकारले होते. 1 एप्रिलपासून हे शुल्क मागे घेतले जाणार आहे. यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये हे शुल्क सुरू करण्यात आले होते.
दिव्यांगजनांसाठी UDID असेल अनिवार्य
17 सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना 1 एप्रिलपासून केंद्राकडून जारी केलेले युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (UDID) क्रमांक अनिवार्यपणे द्यावा लागेल. सरकारने म्हटले आहे की ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड नाही त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासह यूडीआयडी नोंदणी क्रमांक (केवळ यूडीआयडी पोर्टलवरून तयार केलेला) द्यावा लागेल.
जास्त प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर कर भरावा लागेल
तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम पॉलिसी खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशावर ताण येऊ शकतो. 1 एप्रिल 2023 पासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे.