Crime News : टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रिकार्डो क्रिस्टफर गोम्स (३६), प्रियांशू सैवाल बिसवास (२३), अनिकेत अभिजित बिसवास (२४, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्ब्ल आठ मोबाईल, तीन संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप आणि आठ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल होता, अखेर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
डॉ. उल्हास बेंडाळे यांनी त्यांचे दहा सहकाऱ्यांसह सेव्हर सिस्टर पाहायला जाण्यासाठी फेसबुकवर थींकट्रीप ट्रॅव्हल्स या नावाची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना संबंधित व्यक्तीने ॲडव्हान्स ३ लाख १५ हजार रूपये तसेच टूर बुक झाली म्हणून ७ लाख २० हजार रूपये आणि आरटीपीसीआर व क्वारंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी ६८ हजार ८०० रूपये असे लागतील सांगण्यात आले. त्यानुसार बेंडाळे यांनी ११ लाख ३ हजार ८०० रूपयांची रक्कम भरली.
दरम्यान, काही दिवसांनी त्यांचे बुकींग झालेच नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी १३ मार्च २०२३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सायबर पोलिसांनी बेंडाळे यांना आलेले कॉल, व्हॉटस्ॲप मेसेज, ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले त्यांची माहिती घेवून सायबर ठगांचा शोध सुरू केला असता ठग कोलकाता येथे असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर रविवारी रिकार्डो क्रिस्टफर गोम्स, प्रियांशू सैवाल बिसवास, अनिकेत अभिजित बिसवास या तिघांना अटक करून पथक जळगावात दाखल झाले.