---Advertisement---
भुसावळ : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात अयोध्या नगरमधील हुडको कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपये रोकड व सुमारे ३० हजार रुपयांचे दागिने असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.सततच्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी अनोशकुमार रजनीकांत सालवे (वय ६८, रा.हुडको कॉलनी,अयोध्या नगर) हे दि.७ सप्टेंबरपासून १० सप्टेंबरदरम्यान पारिवारिक कार्यासाठी चोपडा येथे गेले होते. दरम्यान,त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी कपाट उचकटून त्यातील ६५ हजार रुपयांची रोकड, १२.१२० ग्रॅम वजनाचा सुमारे २८ हजार रुपयांचा सोन्याचा नेकलेस आणि १.१०० ग्रॅम वजनाचे तीन हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सालवे हे घरी परतल्यावर घरातील चोरी लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे हुडको कॉलनी व अयोध्या नगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून, पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी व चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.