तरुण भारत लाईव्ह ।१२ फेब्रुवारी २०२३। येथील भोलेनाथ मोबाईल शॉपीचे संचालक अमित श्रीदत्त अग्रवाल यांचे लग्न होते. त्यासाठी सर्व परिवार 8 ते 10 फेबु्रवारी दरम्यान बाहेरगावी होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराच्या गच्चीवरून जिन्यातून घरात येणार्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून बेडरुममधील कपाटातील तीन लाख रुपये रोख व 13 तोळे सोने किंमत तीन लाख 90 हजार असा ऐकूण सात लाखांची धाडसी चोरी करून चोरट्यांनी पलायन केले. ही घटना 10 रोजी पहाटे लक्षात आली.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, घरमालक अमित अग्रवाल यांचे लग्न असल्याने 8 फेबु्रवारीपासून ते वर्हाडीसह पाचोरा येथे होते. त्यामुळे घरी कुलूप असल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून नवरदेवाच्या घरी हातसफाई करून सुमारे 7 लाखांची धाडसी चोरी करून पलायन केले. ही घटना घरमालक व नातेवाईक 10 रोजी पहाटे घरी आल्यावर लक्षात येताच स्थानिक पोलिसांना कळविण्यात आले.
घटनास्थळी पहूर पोस्टेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सहकारी कर्मचार्यांसह दाखल झाले. त्यांनी श्वानपथकालाही पाचारण केले. मात्र त्याचाही तपासास फायदा झाला नाही. मात्र बाजारपेठेतील मागील बाजूस असलेल्या घरात धाडसी चोरी झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन पोलिसांनी गस्ती वाढवावी, अशी अपेक्षाही व्यक्त होताना दिसत आहे. याबाबत जोगेश्वर अनिल अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी भेट देवून तपासाच्या स्थानिक पोलिसांनी सूचना दिल्या.
शेंदुर्णी गावात अवैध धंदेही बोकाळले आहे. व्यसनाधीन तरुण रात्री-बेरात्री गल्लीबोळात चौकात वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालतात, नागरिकांना वेठीस धरतात. याकडेही पोलिसांनी लक्ष घालून रात्री दहानंतर गावात गस्त घालावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. चोरट्यांचा तपासही त्वरित लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.