---Advertisement---
Bhusawal Crime : अयोध्यानगरमधील हुडको कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घर टार्गेट करत सुमारे ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सततच्या घरफोड्यांमुळे रहिवासी धास्तावले आहेत.
येथील सेवानिवृत्त कर्मचारी अनोशकुमार रजनीकांत सालवे (वय ६८, रा. हुडको कॉलनी, अयोध्यानगर) हे ७ ते १० सप्टेंबरदरम्यान चोपडा येथे गेल्याने त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उचकटून घरफोडी केली.
चोरट्यांनी घरातील कपाट फोडून ६५ हजारांची रोकड, २८ हजारांचा सोन्याचा नेकलेस आणि ३ हजारांचे सोन्याचे टॉप्स असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सालवे हे घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात कळवले. पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
या प्रकारामुळे हुडको कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस प्रशासनाकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.