जळगाव : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज-लहान मोठ्या घरफोड्या होत आहेत. अशात नातेवाइकांकडे असलेल्या लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गायत्रीनगरातील ज्योती मेकलकर यांच्या नातेवाइकांकडे लग्न असल्याने त्या लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून रोख नऊ हजार रुपये, सहा हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, नथ, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, चांदीचे नाणे, कुंकवाचे दोन करंडे, १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असे एकूण ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. कुटुंबीय घरी आले त्यावेळी ही घटना लक्षात आली.
लक्ष्मी पूजनातील कोऱ्या नोटाही गायब
कपाटामध्ये लक्ष्मी पूजनासाठी वापरण्यात येणारे कोऱ्या नोटांचे सहा बंडलही चोरट्यांनी लांबविले. चोरीमध्ये पूजा साहित्याचा अधिक समावेश आहे. ही घटना ३१ मे ते ६ जून दरम्यान गायत्री नगरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.