---Advertisement---
मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अशात पुन्हा मुक्ताईनगर शहरात एक चोरीची घटना समोर आली आहे. भावाची भेट घेऊन घरी परतणाऱ्या महिलेकडून चोरट्यांनी ७ ग्राम सोन्याचे दागिने चोरून नेले. दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलीस सूत्रानुसार, कमलबाई सोनार आणि त्यांची मुलगी उजवला सोनार दोघी आपल्या गावातच राहत असलेल्या भावाकडे मुक्ताईनगर येथे भेट देऊन घरी परतत होत्या.
बोदवड रस्त्यालगत असलेल्या रस्त्यावरून जात असताना अंधाराचा फायदा घेत, त्याचवेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पोत तोडून पळ काढला.
पोतमध्ये मणी आणि डोरले अशा प्रकारचे सोन्याचे दागिने असून त्याचे एकूण वजन सुमारे सात ग्राम आहे. गाडीचा नंबर शेवटी ७० असल्याचे त्या वृद्द महिलेने व साक्षीदारांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक जयेश पाटील, उपनिरीक्षक नयन पाटील तसेच कर्मचारी महेंद्र सुरवाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून संशयितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अद्याप या प्रकरणी महिलेने गुन्हा नोंद केला नाही. मुक्ताईनगर शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.









