---Advertisement---
जळगाव : अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील एकवीरा मातेच्या मंदिरातून १५ किलो वजनाची तांब्याची घंटा व इतर साहित्य चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांचा पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग केल्याची घटना ४ रोजी मध्यरात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश जरी मिळाले, मात्र चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले.
४ रोजी मध्यरात्री १ ते १:३० वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून आले. पाडसे येथील एकवीरा मातेच्या मंदिरातून सुमारे १५ किलो वजनाची तांब्याची घंटा, एक लहान घंटा, त्रिशूल व तांब्याचा ताट आदी वस्तू चोरून जळगावच्या दिशेने निघाले.
मध्यरात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास ते पाळधी शिवारात पोहचले असता त्याठिकाणी गस्त घालणारे हवालदार संघपाल तायडे आणि पोकॉ. भरत पाटील यांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते न थांबता दुचाकीचा वेग वाढवत जळगावच्या दिशेने निघाले. लागलीच पोह. संघपाल तायडे आणि पोकॉ. भरत पाटील यांनी सरकारी वाहनाने दोघांचा पाठलाग केला.
सुमारे ४ ते ५ किमी पाठलाग केल्यानंतर महामार्गालगतच्या गणपती मंदिराजवळ पोलिसांनी चोरट्यांच्या दुचाकीला कट मारत थांबविले. पोलिस वाहनातून उतरत नाहीत, तोपर्यंत चोरटे चोरलेला मुद्देमाल आणि दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पळन गेले.
चोरीचा मुद्देमाल केला परत
हस्तगत केलेल्या तांब्याच्या घंट्यावर पाडसे गावाचे नाव कोरलेले असल्याने सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत खंडारे यांनी पाडसे येथील अॅड. चिंतामण पाटील, विष्णू बोरसे, सुरेश पाटील आणि गोपीचंद निकम यांना पोलिस ठाण्यात बोलावून हस्तगत केलेला मुद्देमाल सोपविला. धरणगाव पोलिसात दोन अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या कारवाईसाठी हवालदार अर्जुन कुवारे, महेंद्र पाटील, पोकॉ. ज्ञानेश्वर बाविस्कर, राहुल बोरसे, ज्ञानेश्वर सोनवणे यांचे सहकार्य लाभले.