राहुल द्रविडच्या या कृतीने जिंकली सर्व भारतीयांची मनं; हर्षा भोगलेंनी केली पोस्ट शेअर

अहमदाबाद : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याचं भारताचं स्वप्न भंगलं. या पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये निराशा असली, तरी आपल्या तमाम भारतीय क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. याच दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या एका कृतीने तमाम भारतीयांची मनं जिंकली आहेत. प्रसिद्ध क्रीडा समालोचक हर्षा भोगले यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

अंतिम सामन्यात भारताच्या पराभवानंतर सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर पराभवाची निराशा स्पष्टपणे दिसून येत होती. मोहम्मद सिराज आणि कर्णधार रोहित शर्मा यांना अश्रू अनावर झाल्याचं व्हायरल दृश्यांमध्ये दिसत आहे. त्यामुळे एकीकडे भारतीय संघासाठी या भावनांना आवर घालणं कठीण होत असताना राहुल द्रविड पत्रकार परिषदेत माध्यमांना सामोरा आला. विशेष म्हणजे, भारतीय संघ जेंव्हा जिंकत होता तेंव्हा राहुल द्रविड पडद्यामागे राहिला व पराभवानंतर सर्वांना सामोरा गेला.

भारतीय संघाच्या कामगिरीचं आता परीक्षण होत असताना राहुल द्रविडनं मात्र संघाच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही अजिबात संथ खेळ केला नाही. पहिल्या १० षटकांमध्ये संघाच्या ८० धावा फलकावर लागल्या होत्या. कधीकधी डावाला आकार देण्यासाठी तुम्हाला परिस्थितीनुसार खेळ करावा लागतो”, असं म्हणत राहुल द्रविडनं पत्रकार परिषदेत संघाची बाजू उचलून धरली. तसेच, “रोहित शर्मा हा एक उत्तम कर्णधार आहे”, असं म्हणून त्यानं कर्णधाराच्या कामगिरीचंही कौतुक केलं.

दरम्यान, पराभवानंतर माध्यमांना सामोरा आलेल्या राहुल द्रविडचं हर्षा भोगले यांनी कौतुक केलं आहे. “विश्वचषक अंतिम सामन्यानंतरची सकाळ.. पराभवामुळे निराशा तर आहेच. पण त्याचबरोबर याचीही जाणीव आहे की आपल्या संघानं अंतिम सामन्याआधीच्या सलग १० सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळ करून दाखवला. पण भारतीय संघाबरोबरच राहुल द्रविडचं विशेष कौतुक. ते जिंकत असताना हा पूर्ण काळ राहुल द्रविड पडद्यामागेच राहिला. पण जेव्हा संघाचा पराभव झाला, तेव्हा तो हिंमतीनं माध्यमांना सामोरा आला. त्यानं आपल्या खेळाडूंचं समर्थन केलं. रोहित शर्माबरोबरची त्याची जोडी हिट ठरली. आणि अर्थात, पत्रकार परिषदेत अपेक्षेप्रमाणेच तो अतिशय विनम्र होता..नेहमीप्रमाणे”, असं हर्षा भोगलेंनी आपल्या एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.