हे कोणतेही मंदिर नाही… तर आहे जळगावचे बसस्थानक

जळगाव : बस स्थानक म्हटले की बससाठी स्थानकभर फिरत असलेले प्रवासी दिसतात.त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या बसमुळेही या गर्दीत भर पडते. परंतु आज जळगाव शहरातील नवीन बस स्थानकात वेगळेच चित्र दिसले. बस मध्ये बसण्यासाठी प्रवाशांनी चक्क रांग लावली होती. ही रांग बस स्थानकापासून सुरू होत थेट स्थानकाबाहेर निघून स्वातंत्र्य चौकापर्यत लागली होती. असा अचानक झालेला बदल पाहून रस्त्याने जाणारे कुतूहलाने पाहत होते. चौकशी केली असता या शिस्तबध्द रांगेचा उलगडा झाला तो शिवमहापुराण कथेचा.

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद आज एस.टी. महामंडळाने खरे करून दाखवले. रांगेचा फायदा सर्वांना या म्हणीनुसार आज एस.टीचे अधिकारी, पोलीस व होमगार्ड यांनी ही शिस्त लावली. वडनगरी फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिर येथे पंडित प्रदीप मिस्त्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा प्रत्यक्षपणे श्रवण करण्यासाठी भाविक विविध वाहनांद्वारे जात आहेत. यातच एसटी महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष बस सोडल्या आहेत.

 

300 बसेसव्दारे वाहतूक

कथा प्रारंभाच्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरपासूनच जळगाव बस स्थानकातून विशेष बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. यात 6 तारखेला जळगाव आगाराने 152  व इतर आगाराच्या 52 अशा एकूण 204 फेऱ्या झाल्या. 7 तारखेला जळगाव आगाराने 104 तर इतर आगाराच्या 75  अशा एकूण 179 बस फेऱ्या झाल्या आहेत. तसेच 8 तारखेला जळगाव आगाराने 133 तर इतर आगाराच्या 114 बस फेऱ्या अशा एकूण 247 बस फेऱ्या झाल्या आहेत. तर शनिवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून दुपारी दिड वाजेपर्यंत जळगाव आगाराने 72 व इतर आगारांच्या बसेस यांनी 65 फेऱ्या केल्या होत्या.

 

अशी आहे बस संख्या

जळगाव डेपो 200

धुळे 25

बुलढाणा 25

छत्रपती संभाजी नगर 25

जळगाव तालुक्यातील प्रत्येक आगारातून वेगळ्या

 

स्वतंत्र स्थानक

 

शिवमहापुराण कथेसाठी नवीन बस स्थानक परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक एक मिनीटांत येथून कथास्थळाकडे बस सोडण्यात येत आहे. बस स्थानकात आलेल्या भाविकांना कथास्थळाकडे जाणाऱ्या बस लवकर मिळाव्यात यासाठी लाऊड स्पिकरवरुन उद्घोषणा करण्यात येत आहे. आकर्षक स्वरूपात उद्घोषणा करण्याचे काम मेस्को सुरक्षा रक्षक विलास साळुंके करत आहेत. यातच उद्घोषणा दरम्यान ते पंडित प्रदिप मिश्रा यांच्या प्रवचन देखील ऐकवित आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे बस स्थानकात आलेल्या भाविकांना वडनगरीला जाणारी बस कोठे उभी आहे हे तत्काळ कळत आहे. एक बस गेल्यानंतर लागलीच त्या बसच्या मागे दुसरी बस कथास्थळाकडे जाण्यास तयार उभी असल्याचे चित्र पहावयास मिळात आहे. यात या बसेसचा नोंद ठेवण्याचे काम वाहक बबन नन्नवरे हे चोखपणे ठेवत आहेत.

 

असा आहे बस मार्ग

 

श्रीशिवमहापुराण कथेसाठी सोडण्यात आलेल्या विशेष बस ह्या आकाशवाणी चौक, शिवकॉलनी, पेटोलपंप, खोटेनगर, कचरा फॅक्टरी मार्गांने धावत आहेत. याबसेसमध्ये नवीन बस स्थानकासह आकाशवाणी चौक, शिवकॉलनी, पेट्रोलपंप, खोटेनगर, चंदुअण्णानगर चौक येथूनही भाविक बसत आहेत. बसमध्ये प्रवेश करण्यासाठी लाबंच लांब रांग लावत आहेत. ते शिस्तीने पोलीस व होमगार्ड यांच्या मदतीने बसमध्ये चढत आहेत. यामुळे कोणताही प्रकारचा गडबड गोंधळ होत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

या बस खोटे नगर मार्गाने कथास्थळी भाविकांना घेऊन एक प्रकारे आपली सेवा देत आहेत. यात जळगाव आगार व इतर आगाराच्या बसेसचा समावेश आहे.