पुणे : एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र सरासरी एप्रिल ते जून महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवस हवामान विभागानं राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आजपासून (१ एप्रिल) पुढील ५ दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ६ एप्रिल ते गुरुवार ९ एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील बुलढाणा, वर्धा नागपूर जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात वातावरणात बदल जाणवत आहे.