हा प्रवास आता सिग्नल फ्री

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 

नवी मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नल फ्री

मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील १.२३ किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवी मुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत या प्रकल्पासाठी २२३.८५ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच आज लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपुलाकरिता ८६.३३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

 

पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी आणखी गतिमान

सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शन पर्यंत ३.०३ किमी लांबीचा उन्नत मार्गाचे लोकार्पण करून आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नुकतेच मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उन्नत मार्गाच्या दोन मार्गिकांचे तसेच एमटीएनएल आर्मचे लोकार्पण केले होते. बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्याद्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमी चा उन्नत मार्ग असणार आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत बीकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत, तसेच ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेत, त्यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. तसेच दोन्ही द्रुतगती महामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नल विरहित डबल डेकर उन्नत मार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल.

 

मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांची जलद जोडणी करण्याच्या दृष्टीने प्राधिकरण कार्यतत्परने सर्व प्रकल्पांचे लोकार्पण करत आहे. घाटकोपर येथील छेडानगर हे पूर्व द्रुतगती महामार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोड पूर्ण झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन येथे नवी मुंबई वरून येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकोंडी होत होती. तसेच ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांना सिग्नल वर बराच वेळ थांबावं लागत असे. आज उद्घाटन झालेल्या या उड्डाणपुलामुळे आता ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता विनाव्यत्यय आणि सिग्नल विरहित होणार आहे. तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कापडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ज्याच्यामुळे आता मुंबई च्या पूर्व व पश्चिम भागाची जोडणी सुकर झाली आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर श्रीनिवास यांनी दिली.