राष्ट्रवादीच्या या खासदाराचा सावरकर गौरव यात्रेला पाठिंबा!

मुंबई | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत असतांना त्यास प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावकरांचा त्याग, देशप्रेम आणि विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. या गौरव यात्रेचे स्वागत करण्याची भुमिका राष्ट्रवादीच्या एका खासदाराने जाहीरपणे मांडली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. या यात्रेच्या आयोजनावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मत मांडले आहे.

डॉ.कोल्हे म्हणाले की, प्रत्येक मराठी माणसाला स्वातंत्रवीर सावरकरांविषयी आदर आहे आणि तो असणे स्वाभाविक आहे. आपल्या साहित्य वाचनाची सुरुवात ‘काळे पाणी’ या पुस्तकाने झाली आहे. सावरकर हे अनेक क्रांतिकारकांची ते प्रेरणा राहिले आहेत. जेव्हाही महापुरुषांचा अपमान झाला, तेव्हा आम्ही त्याचा कठोर शब्दात निषेध केला. खरे तर कोणत्याही महापुरुषांचा राजकीय वापर केल्यापेक्षा त्यांच्या विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

सावरकर गौरव यात्रेबाबत बोलताना अमोल कोल्हे यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. राहुल गांधींनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही प्रश्न केंद्रातील मोदी सरकारला विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही देशाला मिळालेली नाहीत. सावरकर गौरव यात्रा काढून त्या चार प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, तर अशी यात्रा नक्कीच काढावी. सावकरांच्या साहित्यांचा जागर हा प्रत्येकाने करावा. प्रत्येकाच्या मनात सावरकरांविषयी आदर असावा. सावरकर गौरव यात्रा काढल्याने त्यांच्या साहित्याचा जागर होईल, पण या यात्रेने राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील, तर त्या यात्रेचे नक्कीच स्वागत करू, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.