दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातमधील वर्ल्ड क्लायमेट ऍक्शन समिटमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान पोहोचले होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली. या भेटीचा फोटो मेलोनी यांनी शेअर केला. तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दुबईत संपन्न झालेल्या सीओपी२८ मध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढला. या फोटोत दोघे छान हसताना दिसत आहेत. मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला. सीओपी२८ मध्ये चांगले मित्र, अशा कॅप्शनसह मेलोनी यांनी मोदींसोबतचा फोटो शेअर केला. यामध्ये त्यांनी स्वत:चं आणि मोदींचं नाव एकत्र करत हॅशटॅग वापरला आहे.
सीओपी२८ मध्ये जगभरातील देशांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. त्यांनी एकमेकांसोबत फोटो काढले. त्यावेळीही मोदी आणि मेलोनी यांच्यातील केमिस्ट्री दिसून आली. दोघे हसताना, संवाद साधताना दिसले. पंतप्रधान मोदी दुबईत आयोजित सीओपी२८ मध्ये सहभागी होऊन शुक्रवारी रात्री भारतात परतले. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. समिटच्या आयोजनानिमित्त त्यांनी दुबईचे आभार मानले. ‘सीओपी२८ समिट उत्तम झाली. चांगलं जग तयार करण्यासाठी मिळून काम करत राहू,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.