नवी दिल्ली : देशात बेरोजगारीच्या प्रश्नावर चर्चा होत असतांना नाईट कफ्रँक इंडिया आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स (RICS) या संस्थांनी संयुक्तपणे सादर केलेल्या रिपोर्टमध्ये 2030 सालापर्यंत देशात केवळ एका क्षेत्रातून 10 कोटींहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तविला आहे.
देशातील बांधकाम क्षेत्रामध्ये 2030 सालापर्यंत 10 कोटींहून अधिक नोकऱ्या उपलब्ध असतील, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. बांधकाम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र आहे. सध्या या क्षेत्रात 7.1 कोटींहून अधिक कामगार आहेत. ही संख्या 2030 सालापर्यंत 10 कोटींच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
भारतातील बांधकाम क्षेत्राचं मूल्य सध्या 650 बिलियन डॉलर्स एवढं आहे. हे 2030 सालापर्यंत वाढून 1 ट्रिलियन डॉलर्स एवढं होईल, अशी शक्यताही या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. सध्या बांधकाम क्षेत्रातील 7.1 कोटी कर्मचाऱ्यांपैकी 44 लाख कर्मचारी हे कुशल तंत्रज्ञ आहेत. यामध्ये इंजिनिअर, टेक्निशिअन आणि क्लार्क यांचा समावेश आहे.
सध्या उपलब्ध असणाऱ्या 7.1 कोटी कामगारांपैकी तब्बल 81 टक्के कामगार हे अकुशल असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तर, केवळ 19 टक्के कामगार हे कुशल आहेत. डेव्हलपर्स आणि कंस्ट्रक्शन कंपन्यांकडून कुशल कामगारांची मागणी केली जात आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने, शैक्षणिक संस्थांनी आणि प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असं अहवालात म्हटलं आहे.