अमळनेरात कोळी जमातीचे ठिय्या आंदोलन स्थगित; आता ‘या’ तारखेला काढणार ताकदीनिशी मोर्चा

अमळनेर/चोपडा : तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे दाखले मिळावेत, यासाठी १ जुलै रोजी अमळनेर प्रांत कार्यालयावर भव्य बिऱ्हाड मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. परंतु नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी निमित्त ७ जुलै पर्यंत आचारसंहिता असल्याने जिल्ह्यात १४४ कलम जारी असल्याचे पत्र संबंधित विभागाकडून आल्याने कोळी लोकांतर्फे कायद्याचा आदर करून आपल्या न्याय व हक्कांसाठीच्या मागणी कार्याला गालबोट लागू नये म्हणून हा मोर्चा व आंदोलन स्थगित करण्यात आलेले असून कायदा, शांतता व सुव्यवस्था राखूनच व कायद्याच्या चौकटीत राहूनच पुढील १५ जुलै रोजी त्याच ठिकाणी पुन्हा संपूर्ण ताकदीनिशी मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी तालुका जिल्हा व राज्यभरातील हज्जारों कोळीबांधव अमळनेरात येणार आहेत. याबाबतचे निवेदन संबंधित विभागांना देण्यात आलेले असून निवेदनावर प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या सह्या आहेत. अशी माहिती चोपडा कोळी जमातीतर्फे जगन्नाथ बाविस्कर व अमळनेर कोळी जमातीतर्फे मधुकरगुरु सोनवणे यांनी ह्या पत्रकांन्वये दिली आहे.

प्रांत कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावेत
ज्यांनी अजूनही संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज सादर केलेले नसतील किंवा ज्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले असतील, क्युरी लावलेली असेल अशा सर्व अर्जदारांनी प्रांत कार्यालयाकडे तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत. व त्याची टोकनपावती सोबत घेऊन १५ जुलैच्या मोर्च्यात जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे..
जगन्नाथ बाविस्कर / तालुकासंपर्क,
महर्षी वाल्मिकी समाज मंडळ, चोपडा.