थोरपाणी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाची मदत; यांचे लाभले सहकार्य

यावल : यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी परिसरात एक घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. या कुटुंबाच्या वारसास प्रत्येकी चार लाख प्रमाणे १६ लाख रूपयांची शासकीय मदत प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.

यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी परिसरात २६ मे रोजी जोरदार वादळी पाऊस झाला होता. येथील नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्याने  नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्‍याखाली अडकले. त्यांना श्‍वास घेण्यासाठी अडचणी आल्यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ) त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई असे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर या घटनेत ८ वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला.

दरम्यान, या घटनेनंतर नानसिंग पावरा यांच्या कुटुंबातील सुदैवाने बचावलेला त्यांच्या ८ वर्षाच्या शांतीलाल पावरा यास शासकीय पातळीवर भरीव अशी शासनाची मदत मिळावी, याकरीता महसुल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या आदेशाने फैजपुर विभागाच्या प्रांत अधिकारी देवयानी यादव, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी विशेष लक्ष देत शांतीलाल पावरास शासनाच्या मदतीसाठी लागणारी आवश्यक ती शासकीय दाखले त्यास मिळुन दिले.

यांचे लाभले सहकार्य
या कुटुंबाच्या वारसास अर्थात शांतीलाल पावरा यास प्रत्येकी चार लाख प्रमाणे १६ लाख रूपयांची शासकीय मदत प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली. विशेषतः केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षा खडसे व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व महाराष्ट्र राज्याचे पुर्नवसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनाथ शांतीलाल पावरा यास तात्काळ शासकिय मदत मिळली असून, शांतीलाल पावरा यास दिलासा मिळाला आहे.