Pandharpur Wari : पंढरपूरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतूर झाले आहेत. जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी भुसावळ येथून एक विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळं जिल्ह्यातील हजारो भाविक वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.
यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. रेल्वे चालक व वाहकांचा सत्कार करत भाविकांना मंत्री खडसेंनी शुभेच्छा दिल्यात.
आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांना विठोबा रखुमाईचे दर्शन घेता यावे, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून मंत्री रक्षा खडसे व भाजपकडून या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येते. यंदाही विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याने जवळपास अडीच हजारहुन अधिक भाविक हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.
मंत्री रक्षा खडसेही भजनात दंग झाल्या होत्या. त्यांनी भजन गायलं. पांडुरंगाच्या नावानं उत्साहाचं वातावरण होतं. तसेच मंत्री रक्षा खडसे यांनी पुढच्या वर्षी एक नव्हे तर दोन रेल्वे सोडू असा मानस यावेळी व्यक्त केला आहे.